सुवर्णा कांचन, मुख्य संपादक
पुणे : संत परंपरेचा सुगंध, अभंगांचा गजर आणि वारकरी भक्तीचा अविरत प्रवाह अनुभवण्याची पर्वणी हवेली तालुक्यातील वारकरी बांधवांना लाभणार आहे. हवेली तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने शुक्रवार, दि. १५ मे २०२६ रोजी श्रीक्षेत्र थेऊर येथे ‘वासंतिक चंदनउटी मोगरा आरास वारकरी भजन व संमेलन’ या भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत श्री महातारी माता मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघणार असून, संत ज्ञानेश्वर-तुकारामांच्या नामगजराने थेऊर नगरी दुमदुमून जाणार आहे.

हवेली तालुक्यातील तब्बल ७१ गावांतील वारकरी, भजनी मंडळे, किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक तसेच महिला-पुरुष दिंड्यांचा उत्स्फूर्त सहभाग या सोहळ्यात लाभणार आहे. सुमारे ५०० टाळकऱ्यांच्या एकसुरात होणाऱ्या हरिनामाच्या गजरातून वारकरी परंपरेचे सामर्थ्य आणि भक्तिभावाचे दर्शन घडणार आहे. मोगऱ्याच्या सुगंधाने आणि चंदनउटीच्या आरासीत सजणारा हा सोहळा अध्यात्म, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा सुंदर मिलाफ ठरणार आहे.
“या रे या रे लहान थोर, याति भलते नारीनर” या संत तुकाराम महाराजांच्या अभंग ओळींचा प्रत्यय देत समाजातील सर्व स्तरांतील भाविकांना एकत्र आणण्याचा संदेश या संमेलनातून दिला जाणार आहे. वारकरी परंपरेतील समता, बंधुता आणि भक्तीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या भक्तिमय सोहळ्यास सिद्ध सद्गुरु शांतिनाथजी महाराज, श्रीक्षेत्र पंढरपूर यांचे आशीर्वाद लाभले असून मार्गदर्शक म्हणून गुरुवर्य महादेव दामोदर काकडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, श्रीक्षेत्र आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान देहू, धर्मवीर संभाजी महाराज मंदिर तुळापूर, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, श्रीराम मंदिर देवस्थान उरुळी कांचन, श्री वाघेश्वर महाराज मंदिर वाघोली, श्रीगुरु हरिबाबा दिंडी परंपरेचे वारकरी पुणे तसेच श्री सद्गुरू दौलत बाबा मठ ट्रस्ट शिंदेवाडी यांचे सहकार्य या कार्यक्रमास लाभत आहे.

समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र थेऊर, चिंतामणी भजनी मंडळ, महातारी आई भजनी मंडळ आणि चिंतामणी प्रासादिक दिंडी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक ह.भ.प. आनंदमहाराज विश्वनाथ तांबे हे किर्तनकार व प्रवचनकार म्हणून परिचित असून त्यांनी मराठी व शिक्षणशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
या सोहळ्यास खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार अॅड. अशोक बापू पवार, तात्यासाहेब रामचंद्र काळे, जितेंद्र बडेकर, कोमल संदेश आव्हाळे, किरण साकोरे, युवराज काकडे, ह.भ.प. नवनाथ महाजन काकडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, बीरधवल उर्फ बाबा जगदाळे, सुरेखा हरगुडे, रुपाली कोंडे, विद्या गायकवाड, मोनिका कंद, सुषमा मुरकुटे, अमोल टेकाळे आदी मान्यवरांचीही उपस्थिती लाभणार आहे.
भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा भक्तिरंगमय सोहळा हवेली तालुक्याच्या सांस्कृतिक परंपरेत ऐतिहासिक पर्व ठरेल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक