सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : उरुळी कांचन पोलिस स्टेशन हद्दीतील उमेश राजेंद्र अवचर (वय ३२) या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियामध्ये त्याचा मृत्यू विषारी दारू प्राशनामुळे झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र, या संदर्भातील माहिती अप्रमाणित असून सद्यस्थितीत असा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे उरुळी कांचन पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश अवचर यांचे शवविच्छेदन पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले.

प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार मृत्यू विषारी दारू प्राशनामुळे झाल्याचे निष्पन्न झालेले नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत तसेच उपलब्ध वैद्यकीय नोंदींच्या पडताळणीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मयत उमेश अवचर यांचे यकृत (लिव्हर) आणि स्वादुपिंड (पॅन्क्रियाज) हे अवयव पूर्वीपासूनच गंभीर स्वरूपात बाधित होते. या आजारांवर त्यांच्यावर वेळोवेळी वैद्यकीय उपचार सुरू असल्याची नोंद आढळून आली आहे.

याशिवाय, संबंधित व्यक्तीला अतिमद्यपानाचे व्यसन असल्याची माहितीही चौकशीतून समोर आली आहे. त्यामुळे मृत्यूमागील कारणांचा सखोल तपास सुरू असून केवळ सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या संदेशांच्या आधारे विषारी दारूमुळेच मृत्यू झाला, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे परिसरात विविध चर्चा सुरू झाल्या असल्या तरी अधिकृत वैद्यकीय अहवाल आणि तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही माहिती सत्य मानू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. अप्रमाणित बातम्या किंवा अफवा समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यास जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, याकडेही पोलिसांनी लक्ष वेधले आहे.

उरुळी कांचन पोलिस स्टेशनकडून नागरिक तसेच प्रसारमाध्यमांना जबाबदारीने वर्तन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत तपास आणि वैद्यकीय निष्कर्ष समोर येईपर्यंत कोणतीही अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी केले आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *