सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : आगामी काळात ‘ऑरेंज क्रांती’मुळे युवकांसाठी रोजगार, उद्योग आणि नवसंशोधनाच्या अमर्याद संधी उपलब्ध होणार असून, या क्रांतीमध्ये भारताला जागतिक स्तरावर अग्रेसर ठेवण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. संजीव सोनवणे यांनी केले.

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन आलोक जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदीप रावत, प्रफुल गाडे, मेघराज राजेभोसले, मनोज एरंडे, संतोष रासकर, मंदार जोशी, रणजित हगवणे, सुनील भंडगे, संजय ठुबे आणि संजय पारीख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आलोक जैन म्हणाले, ‘‘आगामी काळात ऑरेंज इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक ठरणार आहे. भारताची समृद्ध संस्कृती, कला आणि परंपरा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचविण्यात तंत्रज्ञानाधारित मनोरंजन क्षेत्राची प्रभावी भूमिका राहील.’’

मेघराज राजेभोसले यांनी ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो’ हा मनोरंजन क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. ‘‘मनोरंजन क्षेत्रातील तंत्रज्ञ, विद्यार्थी आणि कलावंतांसाठी हे प्रदर्शन अविस्मरणीय अनुभव देणारे ठरेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनाचे मुख्य संयोजक तथा सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक संतोष रासकर म्हणाले, ‘‘भारताला भविष्यात ऑरेंज इकॉनॉमीचे जागतिक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या नव्या आणि वेगाने वाढणाऱ्या आर्थिक व्यवस्थेबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.’’
शनिवार (ता. ३०) आणि रविवार (ता. ३१ मे) या दोन दिवसांत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनात क्रिएटिव्ह क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, संकल्पना आणि रोजगाराच्या संधींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

कॉमिक्स, अॅनिमेशन, ग्राफिक्स, गेम्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, डिजिटल शैक्षणिक साधने, व्हर्च्युअल प्रोडक्शन, 3D प्रिंटिंग आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी आदी क्षेत्रांतील निर्मिती प्रक्रिया, त्यामागील कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या क्षेत्रातील रोजगार आणि उद्योगवाढीच्या संधींबाबत संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *