
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : राज्यातच नव्हे तर देशभरात सर्रास विक्री होणारी हातभट्टीची दारू अत्यंत घातक असून अशा बेकायदा मद्यविक्रीला कायमचा आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात रसायनयुक्त विषारी दारूचे सेवन केल्याने २२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी मृतांच्या काही कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये, तर महापालिकेकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मृतांच्या वारसांना नोकरी देण्याबाबतची मागणी विचाराधीन असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, ‘‘मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक आर्थिक संकट निर्माण झाले असून त्याचा परिणाम देशावरही झाला आहे. त्यामुळे इंधनदर वाढले आणि त्याचा परिणाम महागाईवर झाला. मात्र, युद्धस्थिती निवळल्यानंतर इंधनदर कमी होतील आणि महागाईलाही आळा बसेल.’’
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर केलेल्या ‘महागाई मॅन’ या टीकेचाही आठवले यांनी समाचार घेतला. ‘‘मोदी हे विकासाचे प्रतीक असून देशाची शान आहेत. त्यांच्यावरील आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत,’’ असे ते म्हणाले.
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना आठवले यांनी सांगितले की, काही जाती या उपवर्गीकरणाच्या बाजूने आहेत, तर काही विरोधात आहेत. २०२७ मधील जनगणनेच्या आधारे अनुसूचित जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने मराठा समाजाला दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण दिले असून राज्यातही त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील घटकांना इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यास हरकत नसल्याचे सांगतानाच, सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रिपब्लिकन पक्षाला सत्तेत योग्य वाटा मिळावा
विधान परिषदेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने उमेदवारीसाठी दावा केलेला नसला तरी पक्षाला एक जागा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी दिले होते, असे आठवले यांनी सांगितले.

आगामी काळात रिक्त होणाऱ्या पाच जागांपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच दोन शासकीय महामंडळांच्या अध्यक्षपदांवरही पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. पक्ष आकाराने लहान असला तरी सत्तेत त्याला योग्य वाटा मिळालाच पाहिजे. मित्रपक्षांनी याची जाणीव ठेवावी,’’ असेही आठवले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
बापुराव चौधरी उपसंपादक