
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : वारकरी संप्रदायाची शतकानुशतके अखंड सुरू असलेली आषाढी वारी ही केवळ पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाची यात्रा नसून, समता, बंधुत्व, प्रेम, सेवा आणि अध्यात्म यांचा जिवंत महोत्सव आहे. “विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” या संतविचाराला हृदयात जपत लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पायी मार्गक्रमण करत आहेत. या वारीतील शिस्त, सामूहिकता आणि माणुसकीचा अनुभव प्रत्येकाला यावा, या उदात्त हेतूने भक्ती संगम समूहाच्या पुढाकारातून गेल्या १२ वर्षांपासून राबविण्यात येणारा ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम यंदा १३व्या वर्षात पदार्पण करत आहे.

यंदा रविवार, १२ जुलै २०२६ रोजी लोणी काळभोर ते यवत या मार्गावर होणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील संविधान समता दिंडीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतील आणि विविध क्षेत्रांतील ५०० हून अधिक नागरिक सहभागी होऊन वारीचा अनुभव घेणार असल्याची माहिती उपक्रमाचे संयोजक शरद कदम आणि विशाल विमल यांनी दिली.

वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा आत्मा मानला जातो. संत विचार आणि भारतीय संविधानातील समता, बंधुता, न्याय आणि मानवतेची मूल्ये परस्परांना पूरक असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. त्यामुळे केवळ वारकरी किंवा माळकरीच नव्हे, तर समाजातील विविध स्तरांतील नागरिकांना वारीचा अनुभव घेण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध करून दिली जाते.

सुरुवातीची काही वर्षे हा उपक्रम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आयोजित करण्यात येत होता. त्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातही हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. वारीच्या या अनोख्या अनुभवाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आकर्षित केले असून, गेल्या बारा वर्षांत संत तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहूकर, हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे, हभप भारत महाराज जाधव, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, हर्षवर्धन सकपाळ, खासदार सुप्रिया सुळे, माजी पोलिस महासंचालक सुरेश खोपडे, अभिनेत्री मधुरा वेलणकर, सुहिता थत्ते, हभप शामसुंदर महाराज सोन्नर, संत साहित्य अभ्यासक हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, कवी अरुण म्हात्रे, तसेच विविध माध्यमांतील अनेक पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. यंदाही अनेक मान्यवर वारीत सहभागी होणार आहेत.

येत्या रविवारी १२ जुलै रोजी लोणी काळभोर ते यवत या मार्गावरील दुपारच्या विसाव्यापर्यंत सहभागी नागरिक संविधान समता दिंडीतून वारीचा अनुभव घेणार आहेत. या प्रेरणादायी उपक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी विविध वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांनी आपले पत्रकार, वार्ताहर व कॅमेरामन पाठवावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या माध्यमातून वारीतील समता, भक्ती आणि संविधानिक मूल्यांचा संदेश अधिक व्यापक समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
विभागनिहाय संपर्क प्रतिनिधी :
कोकण : शरद कदम (9224576702)
, नागेश जाधव, महादेव पाटील
पश्चिम महाराष्ट्र : ॲड. वर्षा देशपांडे, दत्ता पाकिरे, नरेंद्र डुंबरे, विशाल विमल (72765 59318)
उत्तर महाराष्ट्र : राजाभाऊ अवसक, अविनाश पाटील, दीपक देवरे, सरस्वती शिंदे
मराठवाडा : शामसुंदर महाराज सोन्नर, भारत घोगरे गुरुजी, सुमित प्र. सं.
विदर्भ : सुबोध दादा, डॉ. प्रकाश मानेकर, माया वाकोडे, रवि मानव, बबन कानकिरड
आयोजक : भक्ती संगम समूह, महाराष्ट्र
बापुराव चौधरी उपसंपादक
