सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पोलिस दलातील तब्बल ३५ वर्षे सहा महिन्यांच्या निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवेला पोलिस उपनिरीक्षक (PSI) विद्याधर ज्ञानदेव निचीत यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने ‘उत्कृष्ट सेवा पदक – २०२६’ प्रदान करण्यात आले आहे. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि न्यायालयीन कामकाजातील उल्लेखनीय योगदानाची पावती म्हणून मिळालेला हा सन्मान त्यांच्या सेवा जीवनातील मानाचा टप्पा ठरला आहे.

निचीत यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलात आतापर्यंत ३५ वर्षे सहा महिने सेवा बजावली आहे. या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना तब्बल ३४७ बक्षिसे मिळाली असून, विशेष म्हणजे त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात एकही शिक्षा झालेली नाही. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि निष्कलंक सेवेमुळे त्यांची कार्यतत्परता अधोरेखित झाली आहे.

यापूर्वीही त्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेण्यात आली असून, १ मे २०१७ रोजी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या उत्कृष्ट सेवा पदकामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सध्या निचीत यांची शिवाजीनगर न्यायालयात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. न्यायालयीन कामकाजात सरकारी वकिलांशी सातत्याने संपर्क ठेवून संबंधित गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी आवश्यक ती माहिती, कागदपत्रे आणि सहकार्य उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करीत आहेत. त्यांच्या या समन्वयामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये प्रभावीपणे सरकारी बाजू मांडण्यास मदत झाली आहे.

पुणे ग्रामीणमधील यवत पोलिस ठाण्यातील मोक्का प्रकरण तसेच दौंड पोलिस ठाण्याच्या प्रकरणांमध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी न्यायालयीन कामकाजात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच वेल्हा, कामशेत आणि दौंड पोलिस ठाण्यांतील इतर गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांतही आरोपींना शिक्षा होण्यासाठी त्यांनी पैरवीच्या माध्यमातून प्रभावी भूमिका बजावली आहे. काही प्रकरणांमध्ये कठोर शिक्षाही सुनावण्यात आल्या आहेत.

‘उत्कृष्ट सेवा पदक’ मिळाल्यानंतर निचीत यांनी हा सन्मान केवळ आपला नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि मित्रपरिवाराने दिलेली प्रेरणा यांचे हे फलित आहे, अशी भावना व्यक्त केली. भविष्यातही अधिक प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

३५ वर्षांची प्रदीर्घ सेवा, ३४७ बक्षिसे, एकही शिक्षा नाही आणि न्यायालयीन पैरवीतून अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात योगदान—या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचीत यांना मिळालेले ‘उत्कृष्ट सेवा पदक’ हे त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळालेली सार्थ पोचपावती ठरली आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *