
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : रमेश फिरोदिया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, साकूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व रेड रिबीन क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध आरोग्यविषयक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हेमलता राठोड होत्या.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दत्तात्रय म्हस्के, प्रयोगशाळा अधिकारी, संगमनेर यांनी युवाशक्ती, आरोग्य, संतुलित आहार, नियमित व्यायाम, चांगल्या सवयी आणि ‘स्वतःला ओळखा’ या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवकांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. सुचित्रा पवार यांनी युवकांनी विविध कौशल्ये आत्मसात करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. तसेच मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम ओळखून डिजिटल साधनांचा योग्य व मर्यादित वापर करावा, असे त्यांनी सांगितले. रेड रिबीन क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा, उपलब्ध सेवा तसेच शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यात आली. आरोग्यसेवेची कार्यपद्धती आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयातील सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. जालिंदर पाचरणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष नेत्र तपासणी करून दृष्टीदोष, डोळ्यांशी संबंधित संभाव्य समस्या तसेच डोळ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. हेमलता राठोड यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. युवकांमध्ये मदतीची भावना, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यावर महाविद्यालयाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सर्व प्राध्यापकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरजू शेख यांनी केले. प्रास्ताविक म्हतू खेमनर यांनी केले, तर आभार प्रा. प्रियंका हाके यांनी मानले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप, प्रा. गणेश कुलकर्णी, प्रा. कल्पना शेळके, प्रा. सागर गोसावी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बापुराव चौधरी उपसंपादक
