सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : हवेली तालुक्यातील नायगाव येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात झालेल्या वादातून पुजारी दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ मे रोजी सायंकाळी घडली.

याप्रकरणी सुनिता निलेश भैरवकर (वय ४५, रा. नायगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दादा पिराजी थोरात, मछिंद्रनाथ दादा थोरात, शलाका पिराजी थोरात, रोहिणी दादा थोरात आणि धनश्री दादा थोरात (सर्व रा. नायगाव) यांच्याविरुद्ध बीएनएस कलम ७४, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, १८९, १९०, १९२(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास काळभैरवनाथ मंदिरासमोर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पतीस शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी दादा थोरात याने दगडाने फिर्यादीच्या पतीच्या नाकाजवळ मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादी महिलेलाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, मछिंद्रनाथ थोरात हा कुर्हाड घेऊन घटनास्थळी आला होता. आरोपींनी कुर्हाडीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर फिर्यादी दाम्पत्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली. उपचारासाठी त्यांना उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *