सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : लोणी काळभोर येथील मातंग समाजाचे युवा नेते दिगंबर जोगदंड यांची साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘फकीरा पुरस्कार’ासाठी निवड झाली आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, या निवडीमुळे लोणी काळभोर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिगंबर जोगदंड हे गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील युवकांना शिक्षण, संघटन आणि सामाजिक जाणीव यांची प्रेरणा देण्यासाठी ते विविध उपक्रम राबवत असतात. युवकांना एकत्र आणून समाजहिताच्या चळवळींमध्ये सहभागी करून घेण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. सामाजिक ऐक्य, शैक्षणिक प्रबोधन, विविध शासकीय योजनांची माहिती तसेच गरजू नागरिकांना मदत करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे.

समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि युवकांनी सकारात्मक दिशेने वाटचाल करावी, यासाठी दिगंबर जोगदंड सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, समाजप्रबोधनाची तळमळ आणि संघटनात्मक कौशल्य यामुळे त्यांनी अल्पावधीतच समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या योगदानाची दखल घेत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दिला जाणारा ‘फकीरा पुरस्कार’ त्यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून दिगंबर जोगदंड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा हा गौरव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून, त्यांच्या कार्यातून युवकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *