
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ सप्ताह’ अभियानाच्या नियोजनासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीला सफाई कर्मचाऱ्यांची अत्यल्प उपस्थिती राहिल्याने नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सफाई व्यवस्थेतील शिस्त, जबाबदारी आणि कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात ही बैठक झाली. औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत सुमारे १२५ कायमस्वरूपी कर्मचारी, ४७२ कंत्राटी कामगार, ३०० स्वच्छ कर्मचारी तसेच एसआय, बीएसआय आणि इतर कर्मचारी मिळून जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे.

मात्र, या महत्त्वाच्या बैठकीला केवळ २५० कर्मचारी उपस्थित राहिल्याचे समोर आले.
“स्वच्छतेचे पुरस्कर्ते आणि महाराष्ट्राच्या जनमानसात आदराचे स्थान असलेल्या कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष अभियानाच्या बैठकीला एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी उपस्थिती असणे ही चिंताजनक बाब आहे. कर्मचाऱ्यांची कर्तव्याप्रती असलेली अनास्था प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे,” असे निम्हण यांनी सांगितले.

महापालिकेच्या सफाई व्यवस्थेची तुलना करताना त्यांनी खासगी क्षेत्रातील स्वच्छता व्यवस्थेचे उदाहरण दिले. मॉल्स, मल्टिप्लेक्स, रुग्णालये आणि कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी वेळेचे नियोजन, कामाची गुणवत्ता आणि जबाबदारी याबाबत अधिक शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“महापालिका कर्मचाऱ्यांना तुलनेने अधिक वेतन, शासकीय सुविधा आणि सेवासुरक्षा उपलब्ध असूनही सार्वजनिक स्वच्छतेच्या कामात अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणीही निम्हण यांनी केली. थम्ब एंट्रीद्वारे उपस्थिती नोंद, जिओ मॅपिंग, जिओ टॅगिंग, रिअल-टाइम वर्क रिपोर्टिंग, जीपीएस आधारित मॉनिटरिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर, मोबाईल ॲपद्वारे कामाचा आढावा तसेच स्वतंत्र डिजिटल कमांड सेंटर उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

महापालिकेत अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यभावनेने काम करत असले तरी काही कर्मचाऱ्यांच्या कामचुकार वृत्तीमुळे संपूर्ण व्यवस्थेची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी सांगितले. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देतानाच निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नागरिकांच्या करातून उभ्या राहणाऱ्या व्यवस्थेत सार्वजनिक स्वच्छता ही प्राथमिक जबाबदारी असून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी शहर मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे निम्हण यांनी नमूद केले. सफाई व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करून प्रभावी यंत्रणा उभारावी, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बापुराव चौधरी उपसंपादक
