
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : पुणे महानगरपालिकेतील एमपीएससीमार्फत झालेल्या औषध निरीक्षक भरतीतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पुणे महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथून महापालिकेकडे मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना शिवराज दादा मोरे यांनी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. औषध निरीक्षक भरती घोटाळ्याबाबत दररोज नवी माहिती समोर येत असून, महापालिकेतील संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन तिची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणातील सर्व संबंधितांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), आर्थिक व्यवहार आणि परस्पर संबंधांची तपासणी करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी भीतीच्या वातावरणात महत्त्वाची माहिती पुढे आणत असून, त्या माहितीचीही पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तपास करावा, अशी मागणी मोरे यांनी केली. घोटाळ्याशी संबंधित क्लास चालक, संपूर्ण रॅकेटचे नियंत्रण करणारी मुख्य व्यक्ती तसेच तपासादरम्यान काही संबंधित व्यक्ती अचानक संपर्काबाहेर का होत आहेत, याचाही सखोल तपास व्हावा, असे त्यांनी नमूद केले. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात यावे आणि पुण्याच्या महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे म्हणाले, “हजारो विद्यार्थी कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षा देतात. मात्र वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटी आणि भरती घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. महानगरपालिका भरतीबाबतही अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या असून त्याची गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.”

या आंदोलनात पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार, भूषण रानभरे, उमेश कंधारे, प्रियांका चौधरी, गणेश उबाळे, विश्वजित जाधव, ओंकार मोरे, अभिषेक अवचार, महेश म्हेत्रे, दिलीपसिंग देशमुख, आकाश भोपळे, राहुल शिरसाट, स्वप्निल गायकवाड यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बापुराव चौधरी उपसंपादक
