सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करत उरुळी कांचन येथील वार्ड क्रमांक ३ मधील तांबे-साळुंखे स्नेहसृष्टी परिसरातील नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयात कुटुंबासह रात्रंदिवस शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

स्नेहसृष्टी परिसरात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने शोषखड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्याचे अक्षरशः गटारात रूपांतर झाले आहे. त्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदने देऊन ड्रेनेजची व्यवस्था करण्याची मागणी केली. मात्र, केवळ आश्वासने देण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत कार्यालयातच वास्तव्यास जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये परिसरातील ड्रेनेजचे काम तत्काळ सुरू करणे, कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत सांडपाण्याचा निचरा, पाईपलाईनची दुरुस्ती, खड्ड्यांची साफसफाई, गटारींची स्वच्छता तसेच क्लोरीन व फिनाईलची फवारणी अशा तात्पुरत्या उपाययोजना तातडीने राबविणे आणि नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी, या मागण्यांचा समावेश आहे.

ग्रामपंचायत कार्यालयातच राहणार, पण हक्क मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही,” असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. “आमचे आरोग्य, आमचे हक्क; आम्ही गप्प बसणार नाही”, “रोग नको, दुर्गंधी नको” आणि “एकजुटीने लढू, हक्क मिळवू” अशा घोषणांनी आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.

दरम्यान, तांबे-साळुंखे स्नेहसृष्टी वस्तीतील सर्व रहिवाशांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे ग्रामपंचायत प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, आंदोलनापूर्वी प्रशासन ठोस निर्णय घेते की नागरिकांचा संताप आणखी वाढतो, याकडे संपूर्ण उरुळी कांचनचे लक्ष लागले आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *