
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे: निसर्ग संवर्धनाचा संदेश केवळ शब्दांत न देता प्रत्यक्ष कृतीतून देत महाराष्ट्रभरातील सुमारे २४० ग्रामदूतांनी शिंदवणे घाट परिसरात पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले. ‘मायभू सेवा यात्रा २०२६’ अंतर्गत आयोजित तीन दिवसीय उपक्रमात ग्रामदूतांनी श्रमदानातून जलसंधारण, मृदासंवर्धन आणि वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला.

शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, कराड आणि ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन, उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी ‘मायभू सेवा यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. यात्रेदरम्यान शिंदवणे घाट परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर श्रमदान करण्यात आले. सुमारे ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर जलसंधारणासाठी सलग समतल चर खोदण्यात आले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, मृदासंवर्धन करणे आणि परिसरातील जलसाठा वाढविणे, हा या कामाचा प्रमुख उद्देश होता.

जलसंधारणाच्या कामासोबतच परिसरात २५० देशी व फळझाडांची लागवड करण्यात आली. क्रांतिदिन आणि लोकनायक बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून झालेल्या या वृक्षारोपणातून देशी वृक्षांचे संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

सेवा यात्रेच्या तिन्ही दिवसांत शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक तथा माजी सनदी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख (काकाजी) यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामदूतांच्या सेवाभावाला आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला विशेष प्रेरणा मिळाली.
पर्यावरण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान
सेवा यात्रेच्या समारोपप्रसंगी पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे वनश्री पुरस्कारप्राप्त श्री. अनंत तायडे, संचालक, फोर्टीन ट्रीज फाऊंडेशन, खेड तसेच जिल्हा परिषद सदस्य, राहू-खामगाव गटचे श्री. सागर शेलार यांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल ‘मायभू सेवा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

समारोप कार्यक्रम उत्साहात
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबावडे सर यांनी केले. ऋषीकेश भालेराव यांनी प्रास्ताविकातून ‘मायभू सेवा यात्रे’ची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. शैलेश गायकवाड आणि प्रमोद जाधव यांनी मनोगत व्यक्त करून ग्रामदूतांच्या सेवाभावाचे तसेच पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. मनोज महाडीक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘माझी मायभू, माझी जबाबदारी’ या भावनेतून निसर्गासाठी श्रमदान, मातीशी नाते आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाई निर्माण करण्याचा निर्धार ग्रामदूतांनी व्यक्त केला. युवकांनी केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न राहता जलसंधारण, मृदासंवर्धन आणि वृक्षसंवर्धन या तिन्ही क्षेत्रांत प्रत्यक्ष योगदान दिल्याने हा उपक्रम पर्यावरण संवर्धनातील युवकांच्या सहभागाचे प्रभावी उदाहरण ठरला.
बापुराव चौधरी उपसंपादक
