सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : थेऊर येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या थकीत देणीप्रश्नी ऊस उत्पादक शेतकरी सभासद पुन्हा आक्रमक झाले आहेत. सन २००९-१० आणि २०१०-११ या गळीत हंगामातील थकीत ऊस बिले, त्यावरील व्याज तसेच इतर विविध देणी यांचा हिशेब करून सुमारे ५४६ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा दावा सभासदांनी निवेदनातून मांडला आहे. ही रक्कम सभासदांना मिळावी, यासाठी साखर आयुक्त तसेच प्रादेशिक सहसंचालक, साखर पुणे विभाग यांच्याकडे तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.

सभासदांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून संबंधित आर्थिक देणी प्रलंबित आहेत. २००९-१० व २०१०-११ मधील ऊस बिलांची थकबाकी विहित कालावधीत अदा न झाल्याने त्यावर लागू होणाऱ्या व्याजासह रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारखान्याची आर्थिक पत्रके, उपलब्ध नोंदी आणि देय रकमांच्या तपशिलाच्या आधारे हा दावा मांडण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जमीन विक्रीची रक्कम कुठे जाणार?
कारखान्याच्या जमीन विक्रीतून प्राप्त होणाऱ्या रकमेकडे आता सभासदांचे लक्ष लागले आहे. जमीन विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून सर्वप्रथम शेतकरी सभासदांची थकीत देणी भागवावीत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. जमीन विक्रीची रक्कम स्वतंत्र बँक खात्यात जमा करून ती सभासदांच्या देयकांसाठी राखीव ठेवावी आणि त्यानंतरच अन्य व्यवहारांसाठी तिचा वापर करावा, अशी भूमिका सभासदांनी मांडली आहे.

याशिवाय सभासदांचे शेअर्स वर्ग करणे, वारस नोंदी करणे, भागासाठी येणे असलेल्या रकमांचा हिशेब करणे तसेच सभासदांना देय ठेवी व त्यावरील व्याजाचा विचार करून आवश्यक समायोजन करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

बारा सभासदांचा लढा; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
थकीत देण्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पांडुरंग काळे, विकास लवांडे, सुरेश फकिहरा कामठे, राजेश कोतवाल, अर्जुन यशवंत चौधरी, विठ्ठल बापू हागावणे, रमेश कारभारी कोतवाल, राजेंद्र रतन चौधरी, विजय कोतवाल, बाळकृष्ण कामठे, लोकेश कानकाटे आणि दिपक गावडे यांनी पुढाकार घेतला आहे.

वर्षानुवर्षे रखडलेल्या देण्यांचा हिशेब कधी चुकता होणार?

शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम त्यांना कधी मिळणार? असा सवाल आता सभासदांकडून उपस्थित होत आहे. ५४६ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या दाव्याबाबत साखर आयुक्तालय आणि संबंधित प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे यशवंत कारखान्याच्या सभासदांसह पूर्व हवेलीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *